• mahesh_kale_1250by200.jpg
12 Jan 2018

Pune : रात्रीच्या वेळी नागरिकांना लुबाडणारा सराईत चोरटा जेरबंद, 10 दुचाकीसह 5 मोबाईल हस्तगत
एमपीसी न्यूज - मित्राच्या घरून अभ्यास करून मध्यरात्री घराकडे परत निघालेल्या तरुणाला रस्त्यात अडवून त्याच्याजवळील लॅपटॉप, मोबाईल आणि पाकीट चोरून नेल्याची घटना 10 जानेवारीला सिंहगड पोलिसांच्या हद्दीत घडली होती. याप्रकरणी मानस कोरडे यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यातील आरोपींना सिंहगड रोड पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्या ताब्यातून 10 दुचाकी आणि 5 मोबाईल हस्तगत केले आहे. 
 
शुभम संतोष कांबळे (वय-20, रा.निम्हम चाळ, पाषाण), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. एका अल्पवयीन आरोपीलाही याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे, तर अन्य एकाचा पोलीस शोध घेत आहेत. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरील गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली पल्सर दुचाकी कर्वेनगर परिसरातील वेदांत सोसायटीमध्ये लावल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दुचाकी घेण्यासाठी आलेल्या शुभम कांबळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने दोन साथीदारांच्या मदतीने वरील गुन्हा केल्याची कबुली दिली. 
 
शुभम कांबळे याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने पुणे शहरातील सिंहगड, भारती विद्यापीठ, व वारजे पोलिसांच्या हद्दीतून 10 दुचाकी आणि 5 मोबाईल चोरल्याचे कबूल केले. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही वाहनचोरीचे 6, जबरी चोरीचे 2 आणि दरोड्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी 1 गुन्हा दाखल आहे. 
Read 90 times Last modified on Friday, 12 January 2018 10:57

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares