• IMG-20170812-WA0103.jpg
  • MPC_news.JPG
21 Sep 2017

 

एमपीसी न्यूज - जात पंचायतीच्या पंचानी मागीतलेले 5 लाख रुपये देण्यास नकार दिल्याने एका वकील कुटूंबियाला वाळीत टाकण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पुणे शहरातील खडक पोलीस ठाण्यात पद्मशाली जात पंचायतीच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सचिन नरेंद्र दासा यांनी फिर्याद दिली असून पंच कमिटीचे सरपंच सोमनाथ केंची, विश्‍वस्त महादेव काडगी, अध्यक्ष दिलीप जाना, उपाध्यक्ष विनायक साकाव, सदस्य विनोद जालगी यांच्यावर सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीचे संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, जातपंचायतीची भाड्याने दिलेल्या जागेची भाडेपावती नावावर करण्यासाठी फिर्यादीकडे पाच लाख रुपयांची मागणी केली होती. ती रक्‍कम नाही दिल्यास समाजातून बहिष्कृत करण्याची आणि कुटूंबियांचे बरेवाईट करण्याची धमकी फिर्यादींना दिली जात होती.

20 Sep 2017

गोळीबार झाल्याचा खोटा फोन कॉल केला होता

एमपीसी न्यूज - सांगवी पोलीस ठाण्यात काल, मंगळवारी (दि.19) रात्री साडेबारा वाजता फोन वाजला.... फोनवर एका महिलेने पिंपळे गुरवच्या शहीद भगतसिंग चौकात गोळीबार झाल्याची माहिती दिली. त्याप्रमाणे पूर्ण पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. मात्र घटनास्थळी पोहोचताच असे काही झालेच नसल्याचे उघड झाले. त्यांत पोलिसांनी सखोल तपास केला असता हा फोन महिलेने नाही तर एका तरुणाने केवळ मस्करी म्हणून केल्याचे उघड झाले.

पोलीस ठाण्यात कंट्रोल रुमवरुन कॉल आला की, पिंपळे गुरवच्या शहीद भगतसिंग चौकात गोळीबार झाला आहे. यावेळी पोलीस उपनिरीक्षक शेटे हे त्यांचे कर्तव्य बजावत होते. माहिती मिळताच शेटे हे इतर कर्मच्या-यांसाह काही वेळातच घटनास्थळी पोहचले मात्र प्रत्यक्षात तेथे काहीच आढळून आले नाही. त्यानी जवळच्या इमारतीतील सुरक्षारंक्षकांकडे चौकशी केली असता असे काही घडले नसल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पोलिसांनी कंट्रोलरुमला पुन्हा फोन लावून संबंधित महिलेला फोन लावण्यास सांगितले तर त्या महिलेचा फोन बंद असल्याचे आढळून आले. . त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला. पोलिसांनी या क्रमांकाचा कॉलर आयडी शोधण्यास सुरुवात केली. हा क्रमांक एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका तरुणाचा असल्याचे तपासात उघड झाले. भोसरी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता त्या तरुणाचा फोन चोरीला गेल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी मोबाइलचे लोकेशेन शोधण्यास सुरुवात केली. यातून पोलिसांनी प्रसाद उर्फ लाळ्या दीपक पाटील यास ताब्यात घेतले.

सुरुवातील त्याने या घटनेशी काहीच संबंध नसल्याचे सांगितले. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपणच महिलेचा आवाज काढून हा कॉल केल्याचे कबूल केले.

सांगवी पोलिसांनी अवघ्या बारा तासात तपास करून पोलीस खात्याची दमछाक कऱणा-या आरोपीस अटक केली. शहरात 15 व 16 सप्टेंबर सलग दोन दिवसात पिंपरी व भोसरी येथे गोळीबार झाला. त्याचाच फायदा घेऊन आरोपीने पिंपळेगुरव येथे गोळीबार झाल्याचा फोन करून पोलिसांची फिरकी घेतली. मात्र ही थट्टा त्याला चांगलीच महागात गेली.

20 Sep 2017

एमपीसी न्यूज - बस थांब्याजवळ बस थांबवली नाही या कारणावरून एका नागरिकाने पीएमपी बस चालकास शिवीगाळ करीत मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि.18) जुनी सांगवी येथे माकण हॉस्पिटल जवळ घडली.

या प्रकरणी सांगवी पोलिसांनी मनोज दिगंबर कासार (वय.29 रा. पवनानगर, सांगवी) याला सरकारी कामात अडथळा आल्याच्या कारणावरून अटक केली आहे.

बसचालक गोविंद कोरे (वय.50 रा. हडपसर) या बस चालकाने सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यामध्ये म्हटले आहे की, माकण हॉस्पिटलजवळ बस का थांबवली नाही असे विचारीत चिडून कासार याने कोरे यांना शिवीगाळ केली व हाताने मारहाण करत धमकी दिली.

याप्रकरणी कासार याच्यावर सरकारी कर्मच्या-यास मारहाण व सरकारी कामात डथळा आणणे या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

20 Sep 2017

एमपीसी न्यूज - जमिनीचा व्यवहार व घरगुती कारणावरुन मानसिक व शारीरिक छळ केल्यामुळे पुनावळे येथे 34 वर्षीय विवाहित महिलेने नदीत उडी मारुन आत्महत्या केली आहे.

या प्रकरणी पती नारायण उत्तम दर्शिले, दीर विलास उत्तम दर्शिले व जाऊ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनिता नारायण दर्शिले असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून त्यांच्या आई शोभा ताम्हाणे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2000 मध्ये वनिता व नारायण यांचा विवाह झाला. दरम्यान जमीन खऱेदी केल्याच्या कारणावरुन दीर व जाऊ यांनी वनिता यांचा छळ सुरु केला. त्यानंतर घरगुती कारणावरून मार्च 2017 पासून त्यांचा मानसिक व शारीरिक छळ सुरु केला. अखेर कंटाळून वनिता यांनी पवना नदीत उडी मारून आत्महत्या केली.

याप्रकरणी हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

20 Sep 2017

एमपीसी न्यूज - पत्नीसोबत बोलत असल्याच्या रागातून युवकाचे अपहरण करून त्याला डांबून ठेवून बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी एका तरुणाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना 27 ते 29 ऑगस्ट दरम्यान घडली.

दिलीप बाळू खडके, दीपक बाळू खडके, रवी कांबळे, उदय मारूती कांबळे (सर्व राहणार कोल्हापुर) राहुल पडवळ, अजय आणि अमोल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी दिलीप खडके हे एकाच गावात राहण्यास आहेत. फिर्यादी हा दिलीप खडके याच्या पत्नीशी बोलत असल्याचा राग खडकेला होता. यातून त्याने सोन्याचे दागिने देण्याच्या बहाण्याने फिर्यादीला स्वारगेट येथे बोलावले आणि चाकूचा धाक दाखवून त्याचे अपहरण केले. त्यानंतर त्याला जबरदस्तीने गाडीत बसवून कोल्हापुर येथे नेले आणि डांबून ठेवून मारहाण केली. फिर्यादीने सुटका करून घेत करवीर पोलीस स्टेशन कोल्हापुर येथे गुन्हा नोंदवला होता. पुढील तपासासाठी हा गुन्हा खडक पोलीस स्टेशन पुणे येथे वर्ग करण्यात आला. सहायक पोलीस आयुक्त बाजीराव मोहिते अधिक तपास करीत आहेत.

20 Sep 2017

मोक्कातील फऱार व तडीपार आरोपींचा समावेश ; पिंपरी पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज - सोनसाखळी व वाहनचोरी करणा-या चार सराईत आरोपींना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये ठाणे शहर येथून मोक्क्यातून फरार असलेल्या व पिंपरी येथून तडीपार असलेल्या एका महिला आरोपीचा समावेश आहे. यामध्ये पिंपरी पोलिसांनी पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

काशीम उर्फ तल्लाफ मुक्तार ईराणी (वय.20 रा. सदाशिवनगर, हडपसर) हुसैनी उर्फ गजणी मुख्तार ईराणी (वय.19 रा. पाटीलनगर चाळ, ठाणे) यातील हुसैनी हा ठाणे शहरातून मोका कलमातील फरार आरोपी आहे. तर दुस-या कारवाईमध्ये पिंपरी पोलिसांनी मतीन अकबर कुरेशी (वय.23) आशा मतीन कुरेशी (वय 24) दोघेही राहणार मिलिंदनगर पत्राशेड, चिंचवड यांना अटक केली असून त्यातील आशा कुरेशी हिला चिंचवड परिसरातून तडीपार करण्यात आलेले आहे.

या कारवाईत एक सोनसाखळी चोरी, तीन वाहनचोरी आणि घरफोडीचे तीन असे सात गुन्हे उघडकीस आले. यामध्ये आरोपींकडून सोनसाखळी चोरीमधील दीड तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, आठ तोळ्याचे घरफोडीतील दागिने, स्क्रु ड्रायव्हर, सायकल स्टॅन्ड, एक कटावणी, चार दुचाकी असा पाच लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

यामध्ये आशा कुरेशी या आरोपीवर तडीपारी घोषीत करुनही हद्दीत पुन्हा गुन्हा केल्याने तिच्यावर कलम 142 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक गुन्हे मसाजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक विठ्ठल बढे, सहायक पोलीस अरुण बुधकर, पोलीस हवालदार विवेकानंद सपकाळे, राजेंद्र भोसले, नागनाथ लकडे, शाकीर जिनेडी, पोलीस नाईक जावेद पठाण, महादेव जावळे, संतोष दिघे, दादा धस, पोलीस शिपाई शैलेश मगर, उमेश वानखडे, रोहित पिंजकर, संतोष भालेराव, सुषमा पाटील यांनी केली.

Pimpri chori 1

20 Sep 2017

एमपीसी न्यूज - चहा प्यायल्यानंतर त्याचे पैसे मागितल्याचा कारणावरून एकास बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवार (19 सप्टेंबर) रोजी सकाळी सहा वाजता कात्रज बस स्टॉपच्या समोरील चहाच्या टपरीवर घडली. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे.

याप्रकरणी टपरी चालक फिरोज नदाफ (वय-24, रा.दुगड चाळ, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तुषार विष्णु सुरवसे (वय-21, रा.किरकटवाडी, ता.हवेली) याला पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या चहाच्या टपरीवर आरोपी चहा पिण्यासाठी आला होता. चहा प्यायल्यानंतर फिर्यादीने चहाचे पैसे मागितले असता आरोपीने गचांडी धरून त्याला मारहाण केली आणि त्याच्या खिशातील 1260 रुपये चोरून नेले. पोलीस उप निरीक्षक गायकवाड अधिक तपास करीत आहेत.

20 Sep 2017

एमपीसी न्यूज - परकीय नागरिक नोंदणी कार्यालयाच्या वतीने ऑगस्ट महिन्यात विशेष मोहिम राबवून पुणे शहरामध्ये बेकायदा वास्तव्य करणा-या आणि व्हिसा नियमांचा भंग करणा-या नऊ विदेशी नागरिकांवर कारवाई करण्यात आली.

यामध्ये नायजेरियाच्या दोन तर इराकच्या एका नागरिकांला हद्पार करण्यात आले. याशिवाय नायजेरियाच्या तीन , येमेनच्या दोन आणि इराकच्या एका नागरिकावर ब्लॅकलिस्टची कारवाई करण्यात आली.

20 Sep 2017

एमपीसी न्यूज - क्राईम ब्रँचमध्ये पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून गुलटेकडी परिसरातील सराफ व्यावसायिकाची दीड लाखांनी फसवणूक करणा-या 'त्या' तोतया पोलीस अधिका-यास पोलिसांनी अटक केली.

विजय चंद्रपत पाल (वय 25, रा. गणेश कृपा चाळ, न्यु अशोक नगर, दहीसर ईस्ट, मुंबई) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी जितेंद्र मंछालाल राठोड (वय-43, रा. शंकरशेठ रोड, पुणे) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा सर्व प्रकार नऊ सप्टेंबर रोजी घडला होता.

फिर्यादींचे गुलटेकडी परिसरात सराफी दुकान आहे. घटनेच्या दिवशी आरोपीने दुकानात येऊन मुंबई क्राईम ब्रँचमध्ये पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले. तसेच चोरीचे सोने विकत घेतल्याच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत दीड लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली होती.

20 Sep 2017

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या बसला आज, बुधवारी सकाळी अपघात झाला. ही बस येथील कमळीच्या मळ्याजवळ एका ओढ्यात उलटली. या बसमध्ये 52 विद्यार्थी प्रवास करीत होते त्यापैकी 20 विद्यार्थी जखमी झाले. पाण्यात बुडालेल्या बसमधील मुलांना स्थानिक तरुणांनी बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बसचालक संतोष गाडेकर हा भीमा कोरेगाव मधील अल्-अमीन फाउंडेशनच्या, ग्लोरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या (एमएच 12 एफसी 3059) विद्यार्थ्यांची बस घेऊन निघाला असता स्टिअरिंग रॉड निखळल्याने बसवरील नियंत्रण सुटून ती ओढ्यात उलटली.

बस ओढ्यात उलटल्याचे लक्षात स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेत चालकाच्या बाजूचा दरवाजा उघडून प्रथम पाच मुलांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर चालकाच्या सीटमागील हेडरेस्टने बसची पुढची काच फोडण्यात आली. बसमधील उरलेल्या मुलांना बाहेर काढण्यात आले.

याबाबत बसचा चालक संतोष भंडारे यांच्याविरुद्ध शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल असून, पोलीस उपनिरीक्षक गणेश वारुळे तपास करत आहेत. दरम्यान सहा महिन्यांपूर्वीही या बसचा स्टिअरिंग रॉड निखळूनही शाळा व्यवस्थापनाने गांभीर्याने न घेतल्यानेच पुन्हा दुर्घटना घडल्याची तक्रार पालकांनी केली आहे.

19 Sep 2017

पुणे-सातारा वाहतूक बोगद्यातून वळवण्यात आली

एमपीसी न्यूज- पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात नायट्रिक ऍसिड वाहून नेणारा टँकर उलटला. ही घटना आज, मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच या टँकरमधून होणारी वायू गळती रोखण्यासाठी तातडीने पुण्यातून तंत्रज्ञाची एक टीम रवाना झाली. या अपघातामुळे पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक खंबाटकी घाटातील बोगद्यातून वळवण्यात आली आहे.

पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाट सुरु झाल्यानंतर दुसऱ्याच वळणावर चालकाचा ताबा सुटून नायट्रिक ऍसिड वाहून नेणारा टँकर उलटला. ही घटना आज, मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. अपघातानंतर या टँकरमधून वायुगळती सुरु झाली. घटनेची माहिती मिळताच वायू गळती रोखण्यासाठी तातडीने पुण्यातून तंत्रज्ञाची एक टीम रवाना झाली. अपघातस्थळाच्या आसपास नागरीवस्ती नसल्यामुळे धोका नव्हता.

अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक खंबाटकी घाटातील बोगद्यातून वळवण्यात आल्यामुळे वाहतूक कोंडी झाली नाही.

19 Sep 2017

रशियन, उझबेकीस्तान आणि भारतीय मुलींचा समावेश

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील फाईव्हस्टार हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून तीन मुलींची सुटका केली. या मुलींमध्ये एक रशियन, एक उझबेकीस्तान आणि एका दिल्लीच्या मुलीच्या समावेश आहे. पोलिसांनी यावेळी वेश्याव्यवसाय चालवणा-या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला. ही कारवाई सोमवारी (18 सप्टेंबर) करण्यात आली.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, परदेशी मुलींना जादा पैसे देण्याचे अमिष दाखवून त्यांच्याकडून वेशाव्यवसाय करून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी खातरजमा करत पुण्यातील एका फाईव्हस्टार हॉटेलवर छापा टाकत ही कारवाई केली. यावेळी पोलिसांनी राहुल उर्फ राजू, जॉन उर्फ प्रकाश शर्मा उर्फ जतीन चावला, सागर, टोनी आणि सुरेश या पाच जणांवर गुन्हा दाखल केला.

सदर आरोपी हे एजंटच्या माध्यमातून या मुलींना वेशाव्यवसायासाठी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवत असत. त्यानंतर मोबाईल फोनच्या माध्यमातून ग्राहकांशी संपर्क साधून ठराविक रक्कम आकारून त्या ग्राहकाला सदर मुलींच्या हॉटेलमध्ये पाठवत असत. यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मुलींना रेस्क्यु होम, महंमदवाडी हडपसर येथे संरक्षणासाठी ठेवले आहे.

19 Sep 2017

एमपीसी न्यूज - माजी नगरसेवक कैलास कदम यांच्या खुनाचा कट रचणा-या ऍड. सुशील मंचरकर आणि पिंपरी न्यायालयाच्या आवारातून आरोपीना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या दोन मोरवाडी न्यायालयाच्या आवारातून आरोपींना पळून जाण्यास मदत करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या पोलीस कोठडीमध्ये मोरवाडी न्यायालयाने तीन दिवसाची वाढ केली आहे.

मोरवाडी न्यायालयाने पोलीस नाईक विजय रामदास वाघमारे आणि सुभाष कुंडलिक खाडे या दोन पोलीस कर्मचार्यासहित ऍड. सुशील मंचरकर या तिघांनाही 15 सप्टेंबर रोजी तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत आज संपणार होती. त्यामुळे संबंधीत आरोपींना न्यायालयात पुन्हा हजर केले असता त्यांच्या कोठडीत न्यायालयाने तीन दिवसाची वाढ केली आहे.

पहिल्या सुनावणीच्यावेळी पोलिसांनी न्यायालयाकडे 14 दिवसांची पोलीस कोठडी मागीतली होती मात्र न्यायालयाने केवळ तीन दिवसाची कोठडी दिली होती. त्यामध्ये आज आणखी तीन दिवसाची वाढ करत 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

19 Sep 2017

एमपीसी न्यूज- मंडल अधिकाऱ्याकडून जमिनीच्या एन.ए. ऑर्डरची मंजुरी घेऊन तशी नोंद सातबारा उताऱ्यावर देण्यासाठी 60 हजार रुपयांची लाच स्वीकारताना वाघोलीच्या तलाठ्याला आणि मंडल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघोली येथील तलाठी कार्यालयात आज, मंगळवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास ही कारवाई केली.

संजय बाळू भोर (वय 42, रा. 302/बी, कार्या बिल्डिंग, केसनंद रोड, आयुर्वेदिक कॉलेजजवळ , वाघोली) आणि शिवाजी विष्णू जाधव (वय 48, रा. गुरुकृपा टेरेस, अगरवाल हॉस्पिटच्या जवळ , संघर्ष चौक, चंदन नगर पुणे) केलेल्या आरोपींची नावे आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या जागेची एन.ए. ऑर्डर झालेली आहे. या बाबत मंडल अधिकाऱ्याकडून मंजुरी घेऊन तशी नोंद सातबारा उताऱ्यावर घेण्यासाठी आरोपींनी 36 वर्षीय तक्रारदाराकडे 60 हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाकडे याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर आज, मंगळवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास वाघोली येथील तलाठी कार्यालयात सापळा रचून दोघांना लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाचे पोलीस उप अधीक्षक सुनील यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

19 Sep 2017

एमपीसी न्यूज - सैन्य भरतीसाठी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी एकास बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी (17 ऑक्टोबर) रोजी करण्यात आली.

दाऊद अहमद नुर शेख (वय-22,अहमदनगर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी राजकुमार श्रेष्ठा (वय-42, रा.सदर्न कमांड ऑफीस, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने सैन्यामध्ये भरती होण्यासाठी सादर केलेल्या ऑनलाईन कागदपत्रांमध्ये आणि मूळ कागदपत्रांमध्ये तफावत आढळून आली. याविषयी त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने फेरफार केल्याचे मान्य केले. याप्रकरणी पोलीस उप निरीक्षक पठाण अधिक तपास करीत आहेत.

19 Sep 2017

रुटीन चेकअपसाठी गेलेल्या डॉक्टरांवर एका 75 वर्षीय रुग्णानेच खुनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. हा प्रकार नांदेड फाटा येथील सिंहगड स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सोमवारी सायंकाळी घडला. या हल्यामध्ये डॉक्टरच्या पोटाला आणि हाताला जखम झाली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सिंहगड स्पेशालिटी रुग्णालयातील डॉ. संतोष आवारी हे काही दिवसांपासून दम्याच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णावर उपचार करत होते. त्याची तब्बेत स्थिर होती, परंतु त्याला आणखी काही दिवस रुग्णालयात ठेवणे गरजेचे होते. सोमवारी नेहमिप्रमाणे तपासणी करण्यासाठी डॉ.आवारी त्या रुग्णाजवळ गेले असता त्याने उशीखाली ठेवलेला चाकू काढला आणि अचानक डॉक्‍टरांवर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने डॉक्‍टर गडबडले आणि जखमी अवस्थेतच ते तातडीने तेथून निघून गेले.

त्याच्या शेजारच्या बेडवर असलेल्या एक रुग्णही या घटनेने घाबरुन रुमबाहेर निघून गेला. यासंदर्भात चौकशी केली असता या रुग्णाच्या एका नातेवाईकाने डॉक्‍टरने बिल जास्त लावले असल्याचे हा हल्ला केल्याचे सांगितले. तर रुग्णाला अजून डिस्चार्ज देण्यात आला नव्हता. त्यामुळे कोणतेही बिल केले नव्हते असे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले. या प्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात रुग्णाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

19 Sep 2017


एमपीसी न्यूज - शिवाजीनगर परिसरातील घारपुरे कॉलनीत एका मुलाला कुत्रा चावल्याने कुत्र्याच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना रविवारी (17 सप्टेंबर) दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी दीपक सामल यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


अधिक माहिती अशी की, समर्थ पिसे (वय-17, रा. कुंदन पार्क, शिवाजीनगर, पुणे) हा मुलगा दिपक सामल यांच्या बंगल्यासमोरून कुत्र्याला घेवून जात होता. यावेळी सामल यांच्या कुत्र्याने समर्थचा पाठलाग करत त्याच्या अंगावर धावून गेला आणि त्याच्यावर हल्ला केला. यामध्ये समर्थच्या अंगावर अनेक ठिकाणी चावल्याच्या जखमा झाल्या आहेत.

याप्रकरणी समर्थचे वडील सुशीलकुमार पिसे (वय-52) यांनी फिर्याद दिली असून यामध्ये सामल यांनी पाळलेल्या कुत्र्याच्या सुरक्षिततेविषयी योग्य ती काळजी घेतली नसल्याचा उल्लेख केला आहे. यावरून सामल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

19 Sep 2017


एमपीसी न्यूज- घरकुल चिखली येथे इमारतीच्याया पार्किंगवरून दोघांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये एक जण जखमी झाला आहे. ही घटना आज सकाळी नऊच्या सुमारास घडली.

कपिल गायकवाड (वय 22) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

गायकवाड व सत्तपुरे या दोन कुटुंबामध्ये पार्किंगवरून काही दिवसांपासून भांडणे होती. आज सकाळी कपिल व अंकुश गायकवाड यांच्यात यावरुनच वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने सत्तापुरे याने गायकवाड यांच्या डोक्यात कुंडी घातली. यामध्ये गायकवाड गंभीर जखमी झाले.

कपिलला उपचारासाठी पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात दाखल केले आहे. निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Page 1 of 75